मिशन अ‍ॅडमिशन यशस्वी, आदित्य ठाकरे यांची संकल्पना; महानगरपालिका शाळांमध्ये एक लाख विद्यार्थी वाढले

मुंबई पालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी एप्रिलपासून राबवण्यात येणाऱया ‘मिशन अॅडमिशन’मध्ये या वर्षी पालिकेचे आतापर्यंत तब्बल 1 लाख 619 विद्यार्थी वाढले आहेत. यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता साडेतीन लाखांवर गेली आहे. पालिका शाळेत मिळणाऱया 27 मोफत वस्तू, मोफत ‘बेस्ट’ प्रवास, दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत शिक्षणामुळेच विद्यार्थीसंख्या वाढत आहे. एप्रिल 2022 पासून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढल्याने पालिका शाळांतील पटसंख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी ‘मिशन अॅडमिशन’ उपक्रम राबवण्यात येत आहे. पालिका शाळांचे नामकरण आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे केले आहे, तर 2022 पासून ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’ या ‘मिशन अॅडमिशन’ मोहिमेत शाळा सुरू होण्याआधी एक लाख विद्यार्थी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात आले. यामध्ये पहिल्याच वर्षी तब्बल सव्वा लाख विद्यार्थी संख्या वाढली होती. तर या उपक्रमात या वर्षी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी राजेश पंकाळ आणि राजू तडवी यांच्या पाठपुराव्याने राबवलेल्या ‘मिशन अॅडमिशन’मध्ये एक लाखांवर विद्यार्थी वाढले आहेत.

पालिकेची शैक्षणिक स्थिती
z नर्सरी ते दहावीपर्यंतच्या
एकूण शाळा – 1150
z शाळांच्या एकूण इमारती – 450
z सध्याची विद्यार्थीसंख्या – साडेतीन लाखांवर

माध्यमांत असे वाढले विद्यार्थी

मराठी 15,341
हिंदी 23,817
इंग्रजी 36,561
उर्दू 23,263
गुजराती 493
कन्नड 258
तमीळ 792
तेलुगू 94
एकूण 1,00,619

असा मिळतो प्रवेश

z पालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवरील क्यूआर कोड स्पॅन करून यामध्ये पाल्याचे नाव, पालकांचा मोबाईल क्रमांक, हव्या असलेल्या प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता, प्रवेशाचे माध्यम इत्यादी तपशील भरल्यास शिक्षण विभागाकडून पाठपुरावा करून प्रवेश निश्चित केला जात आहे. शिवाय ऑफलाइनही प्रवेश मिळतो.

z शिवाय http://bit.ly/BMC_MISSITION_ADMISSION_24-25 या लिंकवर शाळेत प्रवेश घेता येतो. शिवाय हेल्पलाइन म्हणून 77770255575 या क्रमांकावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत संपर्क केल्यास आणि प्रत्यक्ष शाळा स्तरावरही पाठपुरावा केल्यास प्रवेश निश्चित होत आहे.