‘केईएम’चे ऐतिहासिक अधिष्ठाता निवास पाडण्याचा पालिकेचा डाव; शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा

मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयामधील शंभर वर्षांचा वारसा असणारे आणि स्वातंत्र्यलढय़ातील महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अधिष्ठाता निवास पाडून नवी इमारत बांधण्याचा डाव पालिका प्रशासनाने आखला आहे. यामुळे पालिकेची ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू नष्ट होणार आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू न पाडता स्ट्रक्चरल ऑडिट करून डागडुजी करावी आणि ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. हा बंगला तोडल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पालिकेचे केईएम रुग्णालय मुंबईत गेली सुमारे 100 वर्षे रुग्णसेवेचे काम करीत आहे. या रुग्णालयाअंतर्गत असलेला वैद्यकीय अधीक्षक (डीन) बंगला हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. ही वास्तू अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. स्वातंत्र्यलढय़ातील अनेक देशभक्तींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत या वास्तूचा उपयोग केला आहे. तत्कालीन डीन डॉ. जीवराज मेहता हे स्वतः केईएम रुग्णालयाचे डीन असूनदेखील त्यांनी त्या वेळी या चळवळीत भाग घेतला होता व येथूनच डॉ. जीवराज मेहता यांना इंग्रजांनी अटक करून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली. यानंतर स्वातंत्र्यानंतर हेच जीवराज गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्रीसुद्धा राहिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आदीसारखे ‘भारत छोडो’ आंदोलनातील अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिक ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान या वास्तूत वास्तव्यास होते. त्यामुळे या बंगल्याचे संवर्धन करून देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र देऊन बंगला न पाडता जतन करावा, अशी मागणी केली आहे.

धोकादायक इमारती पाडून डॉक्टर निवासस्थाने बनवा
चार वर्षांपूर्वी रुग्णालय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून केईएममधील काही इमारती धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जर प्रशासनाला डॉक्टरांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करावयाची असेल तर धोकादायक इमारती पाडून या ठिकाणी नवे टॉवर बांधून निवासव्यवस्था करा, अशी मागणीही पडवळ यांनी केली.