नेव्ही नगर कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता गेल्या अनेक दिवसांपासून ‘अतिशय खराब’च राहत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे ही स्थिती निर्माण होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यामुळे पालिकेने ‘नेव्ही’ला नोटीस बजावली असून प्रदूषणकारी बांधकामांच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. या ठिकाणी वाढलेल्या ओझोनच्या थराबाबतही अभ्यास करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या प्रदूषणामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांना 28 प्रकारचे नियम पाळण्यास बजावले आहे. नियम पाळले नाहीत तर सदर बांधकाम बंद करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बोरिवली पूर्व आणि भायखळय़ातील बांधकामे चार दिवसांसाठी पूर्णपणे बंदही करण्यात आली. मात्र या ठिकाणचा हवेचा दर्जा सुधारल्यानंतर बांधकामांवरील बंदी उठवण्यात आली आहे. नेव्हीच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे या ठिकाणी प्रदूषणाची पातळी कमी होत नसल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने नोटीस बजावली आहे.
शिवाजी पार्कच्या धूळमुक्तीसाठी आयआयटी एक वर्ष अभ्यास करणार
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्कवरील धुळीमुळे परिसरातील रहिवाशांना मोठय़ा समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे मैदान धूळमुक्त करण्यासाठी पालिका आयआयटीकडून अहवाल घेऊन कार्यवाही करणार आहे. मात्र दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आयआयटी तज्ञ, विद्यार्थी तब्बल वर्षभर धुळमुक्तीचा अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्यासाठी पाणी मारण्यासारख्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईतील हवेची स्थिती
कुलाबा एक्यूआय 164 हवा मध्यम दर्जा
घाटकोपर एक्यूआय 284 हवा खराब दर्जा
शिवाजीनगर गोवंडी एक्यूआय 274 हवा खराब दर्जा
सिद्धार्थनगर वरळी एक्यूआय 117 समाधानकारक हवा
बोरिवली एक्यूआय 114 समाधानकारक हवा
भायखळा एक्यूआय 129 समाधानकारक हवा