
मुंबईत 8 जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यास उशीर करणाऱ्या महापालिकेच्या 13 अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे. मुंबईत 8 जुलैला झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले. या खड्डय़ांबाबत पालिकेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रारी आल्या असून आतापर्यंत एकूण 6 हजार 500 खड्डे पडल्याची माहिती महापालिकेकडे आली आहे. नाहूर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, भांडुप या परिसरात खड्डय़ांची संख्या मोठी आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी 13 पालिका अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, पालिका डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट काँक्रिटीकरणावर भर देत असून आतापर्यंत 900 किलोमीटरचे रस्ते काँक्रिटचे झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी 18 पंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यात 9 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे हे सेंट्रल एजन्सी तर, 6 मीटरपेक्षा कमी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पालिकेच्या वॉर्ड स्तरावरून केले जाणार आहे.