नक्षीकाम, रंगकाम, दुरुस्तीसह डागडुजी पूर्ण; पालिकेचे हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालय नवलाईने झळाळले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेचे भायखळा येथील ऐतिहासिक भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयामध्ये नक्षीकाम, रंगकाम, दुरुस्ती आणि डागडुजी अशी कामे करण्यात आल्याने हे हेरिटेज संग्रहालय नवलाईने झळाळले आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या वैभवशाली वास्तूचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मुंबई महानगरपालिका संचालित डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या वास्तूचे नूतनीकरणाअंतर्गत दुरुस्ती, पुनरुज्जीवन व जतनविषयक कामांसाठी मार्च 2023 मध्ये कार्यवाही सुरू करण्यात आली होती. विहित वेळापत्रकानुसार 18 महिन्यांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये इमारतीच्या छतावर जलावरोध कामे, छताची अंतर्गत दुरुस्ती तसेच त्यावरील नक्षीकाम पूर्ववत करणे, आतील व बाह्य प्लास्टर दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती, जोतेक्षेत्राचे संरक्षण, रंगकाम, कठडे, उतरंड (रॅम्प) इत्यादींचा समावेश होता. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे 2 कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नूतनीकरणामुळे या वास्तूला दिमाखदार, सुंदर रूप प्राप्त झाले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संग्रहालये ही संस्कृती आणि इतिहासाची प्रतीके आहेत. समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीची ती साक्षीदार असतात. भावी पिढीला आपला संपन्न इतिहास, वारसा समजण्यासाठी संग्रहालये मोलाची भूमिका बजावतात. मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केलेले डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय प्रेरणा व माहितीचा स्रोत ठरण्याबरोबरच पर्यटनाला प्रोत्साहन देईल. यातील दुर्मिळ वस्तू, छायाचित्रे, शिल्पाकृती या माध्यमातून नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळेल. मुंबईत येणाऱया पर्यटकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. या वास्तुसंग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, उपआयुक्त चंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

असा आहे संग्रहालयाचा इतिहास

मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला इतिहास उलगडून दाखवणारे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे. लंडनमध्ये सन 1851 मध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतील संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. त्यानंतर सन 1855 मध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावाने या संग्रहालयाची स्थापना झाली. सन 1857 मध्ये टाऊन बराक येथे संग्रहालय जनतेसाठी प्रत्यक्षात खुले झाले. संग्रहालयाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीची पायाभरणी 19 नोव्हेंबर 1862 रोजी तत्कालीन गव्हर्नर सर हेन्री बार्टल फ्रेअर यांच्या हस्ते झाली होती. बांधकाम पूर्ण होऊन 1872 पासून या इमारतीत संग्रहालयाचा प्रारंभ झाला. संग्रहालय स्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या सन्मानार्थ 1 नोव्हेंबर 1975 रोजी ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले.