इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या पाच हजार कर्मचाऱ्यांना पालिकेची तंबी, आठवडाभरात कामावर हजर व्हा, नाहीतर पगार कापणार!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून इलेक्शन डय़ुटीवर गेलेले पाच हजारांवर कर्मचारी अजून पालिकेच्या सेवेत हजर झालेले नाहीत. त्यामुळे पालिकेने या कर्मचाऱ्यांना आता अंतिम संधी दिली असून ‘आठवडाभरात कामावर हजर व्हा, नाहीतर पगार कापला जाईल’ अशी तंबी दिली आहे. हे कर्मचारी पालिकेच्या सेवेत पुन्हा हजर झाले नसल्याने संबंधित विभागातील कामावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

निवडणुका जाहीर करण्यात आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱयांना इलेक्शन डय़ुटीसाठी नियुक्त केले जाते. मतदार याद्या अपडेट करणे, मुख्य मतदान आणि मतमोजणीचे काम करावे लागते. मुंबई पालिकेचे 9674 कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून इलेक्शन डय़ुटीवर आहेत. यातील निम्मे कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र सुमारे निम्मे कर्मचारी पालिकेच्या सेवेत रुजू झाले नसल्याने संबंधित कामे खोळंबत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱयांनी तातडीने पालिकेच्या सेवेत हजर व्हावे असे निर्देश दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या 60 हजार कर्मचाऱ्यांची सेवा

निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुमारे दहा हजार तर मुख्य मतदान असलेल्या निवडणूक काळात आणि प्रत्यक्ष मतदानादिवशी पालिकेचे 60 हजार कर्मचारी इलेक्शन डय़ुटीवर हजर झाले होते. मात्र मतदान, मतमोजणी झाल्यानंतर हजर झाले आहेत. मात्र दोन महिन्यांपूर्वी गेलेले अद्याप परत आले नसल्याने पालिका प्रशासनाने आता पगार कापण्याचा इशारा दिला आहे.