अक्राळविक्राळ वाढलेल्या मुंबईचा पसारा जेवढा मोठा आहे तेवढाच मुंबईतून निर्माण होणारा कचरा आणि कचरा निर्माण करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका उद्यापासून ‘कचरामुक्त तास’ मोहीम हाती घेणार आहे. यात रेल्वे स्थानक परिसर, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, व्यावसायिक परिसर, पर्यटन स्थळे आणि वर्दळीच्या ठिकाणी तसेच खाऊगल्ल्यांमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका गेले 55 आठवडे ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण 24 प्रशासकीय विभागात कचरामुक्त तास (गार्बेज फ्री आवर) ही विशेष मोहीम राबवणार आहे. ही मोहीम सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत राबवली जाणार आहे. मोहिमेची पूर्वतयारीसंदर्भात बैठक आज महापालिका मुख्यालयात पार पडली.
मान्यवरांचाही सहभाग
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, बिगर शासकीय संस्था (एनजीओ), राष्ट्रीय सेवा योजना, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
जागरूकतेसाठी पथनाट्य, फ्लॅश मॉब, पोवाड्यांचा वापर
अडगळीत साचलेला व दुर्लक्षित कचरा, बांधकाम राडारोडा प्राधान्याने संकलित केला जाईल. मोहिमेच्या ठिकाणी मार्शल तैनात करण्यात येतील. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य, फ्लॅश मॉब, पोवाडे, इतर लोककला सादर केल्या जातील, असे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले.
…तर खाऊगल्ल्यांतील स्टॉलधारकांवर दंडात्मक कारवाई
मुंबईत असणारी विविध कार्यालये तसेच पर्यटकांचा ओढा असलेल्या परिसरांमध्ये जास्त प्रमाणात खाऊगल्ल्या आहेत. अशा सर्व परिसरांमध्ये खाऊगल्ल्यांच्या परिसरावर अधिक लक्ष केंद्रित करून स्वच्छता करण्यात येईल तसेच स्वच्छता केल्यानंतर संबंधित परिसर नेहमी स्वच्छ राखण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या स्टॉलधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिला.