
वांद्रे पूर्वेकडील कलानगर, साहित्य सहवास, पत्रकार नगर येथील रहिवाशांना महापालिकेच्या अजब कारभाराची प्रचीती आली आहे. मालमत्ता करवसुलीसाठी नेमलेल्या खासगी एजन्सीच्या 15 वर्षांपूर्वीच्या चुकीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेने ‘साहित्य सहवास’च्या रहिवाशांना वाढीव मालमत्ता कर आठवडाभरात भरण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. एजन्सीच्या चुकीची आम्हाला शिक्षा का, असा संतप्त सवाल वृद्ध साहित्यिकांनी पालिकेला केला आहे.
2010 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने 500 चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांसाठी मालमत्ता कर माफ केला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने संबंधित प्रणाली संगणकामध्ये कार्यान्वित करण्यासाठी कोल्हापूरच्या खासगी एजन्सीची नेमणूक केली होती. एजन्सीने मुंबईतील सदनिकांना मालमत्ता करमाफी लागू करताना सॉफ्टवेअरमध्ये चूक केली. त्या चुकीमुळे मोठा आर्थिक तोटा झाल्याचे सांगून पालिकेने वांद्रे पूर्वेकडील कलानगर, साहित्य सहवास, पत्रकार नगर येथील रहिवाशांना मालमत्ता कर भरण्याची नोटिसा पाठवल्या आहेत. 2010 पासूनचा वाढीव मालमत्ता कर आठवडाभरात भरण्याची सूचना नोटिसांमधून करण्यात आली आहे. 17 मार्चची अंतिम मुदत देत पालिकेने वृद्ध साहित्यिकांना नोटिसा धाडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पालिकेने स्वतःच्या चुकीची, निष्काळजी कारभाराची जबाबदारी स्वतः स्वीकारून वाढीव मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी ‘साहित्य सहवास’मधील नागरिकांकडून केली जात आहे.
रहिवाशी संभ्रमात; प्रभाग कार्यालयात चर्चा
पालिकेच्या नोटिसीमुळे रहिवाशी संभ्रमात सापडले आहेत. याबाबत कनिष्ठ अधिकाऱयांकडून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. जाचक करवसुलीचा मुद्दा वरिष्ठ पातळीवर नेण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने वाकोला येथील एच-ईस्ट प्रभाग कार्यालयात रहिवाशांना चर्चेसाठी बोलावले. पालिकेने नोटिसा योग्य असल्याचे म्हटले आहे.
आमच्या सदनिकांच्या वाढीव क्षेत्राबाबत पालिकेला आम्ही कल्पना दिली. त्यावर पालिकेने आम्हालाच नोटिसा बजावून मोठा मनस्ताप दिला आहे. 15 वर्षांपूर्वीच्या एजन्सीची चूक विचारात न घेता मालमत्ता करापोटी लाख-सवा लाख रुपये भरण्यासाठी बजावलेल्या नोटिसा अन्यायकारक आहेत.
– सिद्धार्थ पारधे, साहित्यिक
आमच्या कॉलनीतील नऊ इमारतींना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. 2010 पासून आम्ही जो कर भरला आहे, ती रक्कम कपात न करताच संपूर्ण क्षेत्रासाठी नव्याने मालमत्ता कर भरण्याची सूचना केली आहे. अचानक जारी केलेल्या नोटिसांमुळे आम्हाला धक्का बसला आहे. पालिका व खासगी एजन्सीच्या चुकीचा आम्हाला मनस्ताप का?
– बाळ फोंडके, निवृत्त शास्त्रज्ञ