केवायसीच्या नावाखाली अडवणूक; लाडक्या बहिणींचे सोलापुरात आंदोलन

केवायसीच्या नावाखाली ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जमा रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँकेसमोर आज महिलांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत कर्मचारी काहीकाळ गायब झाले होते.

मुस्लिम पाच्छा पेठेतील जवळपास 100-150 महिलांनी सुराणा मार्केट येथे असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम जमा होण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी खाते उघडले आहे. यातील काहीजणांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे; परंतु बँकेने रक्कम जमा होऊनही केवायसीच्या नावाखाली रक्कम अडवून ठेवली आहे. या महिला मोलमजुरी करणाऱया आहेत. रक्कम मिळविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून रोजगार बुडवून, आर्थिक झळ सोसत बँकेला हेलपाटे घालत आहेत. आज या महिलांचा संताप अनावर झाला होता. दुपारी जवळपास 100 ते 150 महिलांनी बँकेसमोर येऊन पैशासाठी तगादा लावला व ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे बँकेतील कर्मचारी काहीकाळ गायब झाले होते. ही बँक गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत आहे.