ईदच्या आधी मशिदीत स्फोट; बीड पुन्हा हादरला, दोन तरुण ताब्यात

बीड जिल्हा आज पहाटे पुन्हा हादरला. गेवराईतील अर्धमसला येथील मशिदीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून तलवाडा पोलीस ठाण्यासमोर या घटनेविरोधात आंदोलन करण्यात आले.

आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मशिदीत भयंकर स्पह्ट झाला. त्यामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले असून फरशी फुटून जमिनीत सहा इंच खड्डा पडला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अर्धमसला येथे शनिवारी आयोजित ‘संदल’ कार्यक्रमामध्ये विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळे यांनी संदलमध्ये जाऊन मुस्लिम समाजाला शिवीगाळ केली होती. त्यानंतर बाचाबाची झाली. त्यातूनच या दोघांनी मशिदीत स्पह्ट घडवून आणला. दरम्यान, आज आणि उद्या महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले.

दोषींवर कठोर कारवाई करू – मुख्यमंत्री

बीड जिह्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी सरकारकडे महत्त्वाची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत, याचा लवकरच खुलासा केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आधी बनवली रील, नंतर घडवला स्फोट

समाजात विकृती किती वाढत चालली आहे याचा प्रत्यय बीड जिह्यामध्ये रोज येत आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना वेगवेगळे व्हिडीओ काढण्यात आले होते. असाच काहीसा प्रकार अर्धमसलामध्ये घडला. स्फोट घडवण्यापूर्वी आरोपी विजय गव्हाणे याने एका हातात जिलेटिनच्या कांडय़ा आणि दुसऱ्या हातात पेटलेली सिगारेट घेऊन इन्स्टाग्रामवर रील बनवली. या रीलमध्ये ‘शिस्तीत राहा बेटय़ा, मी अंगार भंगार नाही रे’ हे गाणे वाजवले आणि नंतर स्फोट घडवला.