गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. यवतमाळच्या पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरद मैंद यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
ते म्हणाले आहेत की, पंतप्रधान मोदी यांनी सभेत 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारवर बोलले आणि गुलाबी जॅकेटवाले पवार साहेबांचे बोट सोडून भाजपच्या मांडीवर जाऊन बसेल, असं ते म्हणाले.
अमोल कोल्हे म्हणाले की, ”गुलाबी रंग नेमका सांगतो काय? तर 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. नंतर भाजपच्या मांडीवर जाऊन ते बसले. याबाबत विचारले तर विकासासाठी गेला असे ते सांगतात. नेमका एक तरी प्रकल्प पुसदमध्ये आणला का? कुणाला रोजगार इथल्या तरुणांना मिळाला का?”
महायुती सरकारवर टीका करत अमोल कोल्हे म्हणाले की, ” नऊ महिन्यात 1900 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. हा विकास नाही भकास आहे.दिल्लीतून वाजले की माना हलविणारे हे सरकार आहे. प्रत्येक उद्योग धंदा गुजरातला जात आहे. महाराष्ट्रात भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करनारे सरकार आहे.”