Black box diaries- ऑस्कर-नामांकित ‘ब्लॅक बाॅक्स डायरीज’ माहितीपट जपानमध्ये प्रदर्शित होण्यावर बंदी!

‘ब्लॅक बाॅक्स डायरीज’ हा शिओरी इटो यांचा ऑस्कर-नामांकित माहितीपट असून, जपानमध्ये हा माहितीपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. दिग्दर्शकाच्या मूळ देशात म्हणजेच जपानमध्ये माहितीपट प्रदर्शित होण्यास नकार दिल्यानंतर, शिओरी यांना चांगलाच धक्का बसला आहे. शिओरी यांनी नोरियुकी यामागुची या प्रसिद्ध पत्रकारावर बलात्काराचा आरोप केल्याच्या मोठ्या वादानंतर चित्रपट प्रदर्शनास नकार देण्यात आलेला आहे.

 

पत्रकार शिओरी इटो यांना 2015 मध्ये, एका रेस्टॉरंटमध्ये ड्रग्ज देण्यात आले  होते. त्यानंतर टोकियो ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे माजी वॉशिंग्टन ब्युरो चीफ नोरियुकी यामागुची यांनी टोकियोमधील शेरेटन हॉटेलमध्ये त्यांच्यावर बलात्कार केला होता. शिओरी इटो यांनी या घटनेची तक्रार पोलिसांना केली. परंतु यामागुची यांचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी असलेल्या जवळच्या मैत्रीमुळे, त्यांच्या गुन्हेगारी खटल्याला फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही.

पत्रकार म्हणून, शिओरी इटो यांना माहित होते की, झालेल्या घटनेचा माहितीक्रम जतन करायला हवा. इटो यांनी  फौजदारी खटला हरल्यानंतर दिवाणी खटला दाखल केला आणि तो खटला त्या जिंकल्या. एकूणच त्यांनी जतन केलेल्या माहितीपासुन, ब्लॅक बॉक्स डायरीज नावाचे पुस्तक बनले. हेच त्यांच्या माहितीपटाचे नाव आहे. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) चा आजाराचा सामना करताना इटोला यांना स्वतः पुरावे गोळा करावे लागले होते. तसेच प्रमुख साक्षीदारांचा शोध घ्यावा लागला होता.

ही घटना 2015 मध्ये घडली होती, त्यावेळी इटो रॉयटर्स वृत्तसंस्थेत इंटर्नशिप करत होत्या. त्यांनी असा आरोप केला आहे की, यामागुचीने नोकरी संदर्भातील संधीबद्दल चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी, यामागुची टोकियो ब्रॉडकास्टिंग सिस्टम या प्रमुख जपानी मीडिया फर्मचा वॉशिंग्टन ब्युरो चीफ होता. यामागुचीने टोकियोमध्ये जेवण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.