बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो प्रवास मार्चपासून

मेट्रो-3 मार्गावरील आरे ते बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरपासून सेवेत दाखल झाल्यानंतर बीकेसी ते कफ परेडपर्यंतचा पुढचा टप्पा कधी सुरू होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा लागली आहे. मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. परंतु बीकेसी ते कफ परेड नव्हे तर बीकेसी ते वरळी असा टप्पा मार्चपासून मुंबईकरांसाठी सुरू करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेची एकूण लांबी 33.5 किमी इतकी आहे. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर बीकेसी ते कफ परेडपर्यंतचा पुढील टप्पा मार्च 2025 मध्ये पूर्ण करून मेपर्यंत भुयारी मेट्रो कफ परेडपर्यंत धावेल असे सांगण्यात आले होते. पण आता मार्च 2025 पर्यंत बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी असा टप्पा 2 अ वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.

वरळी ते कफ परेडसाठी जूनची प्रतीक्षा

बीकेसी ते कफ परेड हा मेट्रो मार्ग 20.9 किमी लांबीचा असून या मार्गावरील 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. टप्पा 2 अ सेवेत आल्यानंतर टप्पा 2 ब म्हणजेच आचार्य अत्रे चौक, वरळी ते कफ परेड हा पुढील टप्पा जूनपासून सुरू करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.