
अंत्यसंस्कारानंतर रुग्णाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा नातेवाईकांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
विधी विभागाचे शिक्षण घेतलेल्या तसेच एमआरची नोकरी करणाऱ्या सुनील कुमार यादव यांना कोविड झाल्याने 2 मे 2021 रोजी बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तौक्ते वादळामुळे 15 मे रोजी त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. 16 मे रोजी सुनील कुमार यांचे निधन झाले. मुलाला दुसऱया ठिकाणी हलवल्याने व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सुनीलचा जीव गेल्याचा दावा करत रामाशंकर यांनी अॅड. अजय जैस्वाल यांच्या वतीने याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर 17 एप्रिल रोजी होणार आहे.
प्रतिज्ञापत्रात दावा काय…
डॉ. डेरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी नातेवाईकांच्या वतीने करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वादळामुळे राजावाडी रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांना यापूर्वीच देण्यात आली होती. त्यांना दुसऱया रुग्णालयात घेऊन जात असताना योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. कोणताही निष्काळजीपणा करण्यात आला नव्हता, असे नमूद करण्यात आले आहे.