राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या राज्यभरात प्रचार शिगेला पोहोचला आहे, परंतु महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलेच बिनसलेले दिसत आहे. भाजपने महायुतीतील मित्रपक्षांना कमी जागा दिलेल्या असताना आता भाजपचे स्टार प्रचारक केवळ भाजपच्या उमेदवारांसाठी सभा घेत असल्याचे दिसत आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांकडे सपशेल पाठ फिरवल्याचे दिसत आहे. महायुतीत मोठा भाऊ असूनही भाजप मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.
नागपूरमध्ये या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या सभा या फक्त भाजप उमेदवारांसाठीच आहेत. मित्रपक्ष शिंदे गट किंवा अजित पवार गटांच्या उमेदवारासाठी नाही हे स्पष्ट झाले आहे. नागपूर जिह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. या सर्व जागा महायुती लढत आहे. यात सर्वाधिक 11 जागी भाजप, तर एकमेव रामटेकची जागा शिंदे गट लढवत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या दौऱयांची संख्या वाढली आहे. मात्र ते फक्त पक्षाचा उमेदवार असेल अशाच ठिकाणी सभा घेत आहेत. रामटेक या शिवसेनेला सोडलेल्या जागेवर भाजपचे स्टार प्रचारकांनी सपशेल पाठ फिरवली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागपूर दौरा केला. अमित शहा यांनी अमरावीत जिह्यातील मोर्शी दौरा केला. भाजप नेत्या स्मृती इराणी, रविकिशन, मिथुन चक्रवर्ती, शिवराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांचा सभा पार पडल्या आहेत. 17 नोव्हेंबरला अमित शहा पुन्हा नागपुरात प्रचारासाठी येणार आहेत