काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान आणि आरक्षण देऊन मागास जातींना हक्क, अधिकार दिले. वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. याउलट आरक्षण आणि संविधान संपवण्याचे प्रयत्न भाजप करीत असल्याचा पलटवार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज केला. काँग्रेसची सत्ता आल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षणावर घाला घातला जाईल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिवाजी पार्क येथील महायुतीच्या सभेत बोलताना केली होती. या टीकेला रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांचीही टिळक भवनात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील भाजप- शिंदे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. जलयुक्त शिवार योजनेत 10 हजार कोटींचा घोटाळा, रुग्णवाहिका खरेदीत 8 हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.