”शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं जे नकली हिंदुत्व आहे, ते उघड केलं आहे. रेल्वेने हनुमान मंदिर पाडण्यासाठीची नोटीस काढली होती, ती स्थगित केली आहे. भाजपच्या काही लोकांनी तिथे जाऊन नाटक केलं, यानंतर लेखी स्थगिती देण्यात आली. म्हणजेच ही स्थगिती घाईघाईत दिलेली आहे. याचे एकच कारण होतं, कारण आज आम्ही 5.30 वाजता जाऊन तिथे दर्शन घेणार होतो, जो कार्यक्रम आमचा सुरू राहणार आहे. आम्ही 5.30 वाजता जाऊन हनुमानाचे दर्शन घेणार आहोत,” असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
रेल्वेने दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस होती. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने याविरुद्ध आवाज उचलल्यानंतर अखेर पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. यातच आज आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ”आम्ही जे काल केलं, यामुळे भाजपचं दुतोंडी आणि चुनावी हिंदुत्व उघड केलं आहे. म्हणजेच निवडणुकीसाठी आम्हा हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं आणि निवडणूक झाल्यानंतर यांच्याच राज्यात आमची मंदिरे सेफ नसतात. निवडणुकीआधी अनेक अफवा पसरवण्यात आल्या की, कोणी सिद्धिविनायक मंदिरावर दावा केला, कोणी कुठल्या मंदिरावर दावा केला आहे. या, ना त्या बोर्डाने दावा केला. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदू मंदिरेच आधी धोक्यात आली आहेत, त्यातच हे हनुमानाचे मंदिर येतं.”