भाजपचा मुजोर जिल्हा परिषद सदस्य चेतन धोडी याने अधिकार नसतानाही पैसे वसूल करण्याच्या बहाण्याने रात्री उशिरा केमिकल टँकर अडवले. त्यावरून वाद निर्माण झाला असून जाब विचारण्यासाठी गेलेला अन्य सदस्य व ग्रामस्थांना लोखंडी रॉडने धोडी याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात महेश तांबडा व पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मढवी हे जखमी झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा चेतन धोडी व त्याच्या काही साथीदारांनी केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाला पकडले. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून काही कागदपत्रेदेखील ताब्यात घेतली. टँकरचालकाने ही बाब आपल्या मालकाला फोनवरून सांगितल्यानंतर संबंधित मालकाने आपल्या ओळखीच्या कमळाकर पवार यांच्याकडे मदतीसाठी याचना केली.
पवार यांनी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मढवी तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद पराड यांना सोबत घेऊन नवजीवन हॉटेल परिसरात धाव घेतली. या सर्वांनी चेतन धोडी याला फैलावर घेतले, पण धोडीसह त्याच्या साथीदारांनी सर्वांना मारहाण केली. घटनेप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात धोडी याच्यासह अन्य आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या मारहाणीनंतर धोडी फरार झाला आहे.