नगरमध्ये भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात राडा

सावेडी उपनगरातील बंधन लॉन येथे सुरू असलेला ‘टॉक शो’ भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी राडा घालत बंद पाडला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री फडणवीस, खासदार सुजय विखे यांचे बॅनर हातात घेत कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी महिलांना धक्काबुक्की केल्याने संताप व्यक्त होत आहे. मीडियालादेखील भाजपच्या गुंडांनी टार्गेट केले. जे महिलांचा सन्मान करू शकत नाहीत, गुंडगिरी करतात त्यांना लोकशाही मान्य नाही, असा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

खासगी वाहिनीतर्फे सुरू असलेल्या ‘टॉक शो’ला महायुती, महाविकास आघाडी त्याचबरोबर मराठा मोर्चा संघटनेचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होताच भाजपच्या गुंडांनी धुडगूस घालायला सुरुवात केली.

प्रसार माध्यमांसमोरच इन कॅमेरा लाईव्ह धुडगूस घालण्यापर्यंत भाजपच्या गुंडांची मजल गेली आहे. पुण्यात ‘निर्भय बनो’च्या सभेपूर्वी भाजपच्याच गुंडांनी पोलीस बंदोबस्तात हल्ला केला होता. तशाच पद्धतीचा धुडगूस नगरमध्ये भाजपच्या गुंडांनी घातला. सध्या महाराष्ट्राचा बिहार होताना पाहावे लागत आहे. नगर दक्षिणेतदेखील भाजपची गुंडगिरी वाढली आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला.

महिलांना धक्काबुक्की करत बोलू दिले नाही

राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुवर्णा धाडगे म्हणाल्या, ‘भाजपच्या गुंडांनी महिलांना धक्काबुक्की करत त्यांना बोलू दिले नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे नव्हती. त्यामुळेच त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली.’ सायली चेडे म्हणाल्या, ‘मी महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्यावेळी मला बोलू दिले नाही. भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली.’