मुंबईत काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला, पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई काँग्रेसच्या र्फोट येथील कार्यालयावर भाजप युवा मोर्चाकडून भ्याड हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. काँग्रेस कार्यालयात पक्ष कार्यकर्ते-नेत्यांची बैठक सुरू असताना भाजपच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला करीत खिडकी, दरवाजा, खुर्च्यांची तोडफोड केली. पक्षाच्या नामफलकावरही शाईफेक करून जोरदार घोषणाबाजीदेखील केली. या वेळी त्यांना अडवण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. अचानक घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आंदोलकांना हुसकावून लावत चांगलाच चोप दिला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणाहून अक्षरशः पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी तेजींदर सिंग तिवान यांच्यासह 40 जणांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई काँग्रेसच्या र्फोट येथील प्रेस क्लबजवळच्या कार्यालयात आज नेहमीप्रमाणे काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी होती. तर कार्यालयामध्ये काँग्रेसची बैठकही सुरू होती. या वेळी अचानक भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावर चाल करून आले. एकीकडे गृहमंत्री शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात भाजपचा निषेध होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अवमान केल्याचे सांगत कार्यालयावर हल्ला केला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अवमान करणाऱया काँग्रेसचा जाहीर निषेध’ फलक झळकावत हा हल्ला करण्यात आला. या फलकावर भाजपचे पक्षचिन्ह कमळ आणि भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई असा स्पष्ट उल्लेख होता. भाजप कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की त्यांनी खिडकीची जाळी उखडून टाकत काचा फोडल्या. दरवाजावर लाथा मारून कार्यालयात शिरण्याचा प्रयत्नही केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालयातील कर्मचारीही बिथरले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना चोप देत काहींना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये नेले.

भाजपच्या गुंडगिरीला जशास तसे उत्तर – वर्षा गायकवाड

केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांचा अवमान केल्यामुळे त्यांनीच तातडीने माफी मागण्याची गरज असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी सुरू आहे. भाजपचा हा सत्तेचा माज असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली. हल्लेखोरांना अटक करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. भाजपच्या गुंडगिरीला काँग्रेस भीक घालत नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असे गायकवाड यांनी ठणकावले.