
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा सध्या चर्चेत आहेत. एकामागून एक घडणाऱ्या हत्येच्या घटनांनी बीड हादरला आहे. आता आणखी एक हत्येची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे.
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर भाजप कार्यालयासमोर भाजपचे तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 30 वर्षे) याची हत्या करण्यात आली. आज मंगळवारी एका तरुणाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करत आगेची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला.
मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, बीडच्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा दावा
माजलगावमध्ये स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागे भाजप कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर भाजपच्या तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर हा उभा होता. तेथे नारायण शंकर फपाळ राहणार बेलूरा हा तरुण आला. आणि त्याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात आगे हा रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने हत्येची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ माहिती घेत आहेत.