महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुका भाजपने फसवणूक करून जिंकल्या! केजरीवालांचा इशारा

भाजपने महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुका फसवणूक करून जिंकल्या आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याची पोलखोल मी देशासमोर करणार, असा बॉम्ब आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी फोडला. दिल्लीतही भाजपकडून तसेच षड्यंत्र रचले जात आहे मात्र ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी बजावले.

महाराष्ट्रात भ्रष्ट मिंधे-भाजप सरकारविरुद्ध प्रचंड रोष असताना धक्कादायक निकाल लागले. सत्ताधारी आघाडीला राक्षसी बहुमत मिळाले. ईव्हीएम झोल करून हा विजय मिळवण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. राज्यात मोठे जनआंदोलनही उभे राहत आहे. त्याचवेळी आता केजरीवाल यांनी हरयाणा आणि महाराष्ट्रातील निकालांवर थेट आक्षेप घेत भाजपवर बॉम्ब टाकला आहे.

दिल्लीतही व्होटकटाईचे षड्यंत्र

दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना भाजपने दिल्लीतही खूप मोठय़ा प्रमाणात मते कापण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आले आहेत. त्याचे साक्षीदारही आहेत, असे केजरीवाल यांनी नमूद केले. केजरीवाल यांनी एक्सवरूनही एक पोस्ट केली असून त्यात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. भाजपच्या लोकांकडून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले जात आहेत. अशा लोकांना आम्ही रंगेहाथ पकडले आहेत त्याची तपशीलवार माहिती साक्षीपुराव्यासह मी देणार आहे, असा इशारा केजरीवाल यांनी दिला.

महाविकास आघाडीने केली होती तक्रार

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मतदारांची नावे परस्पर वगळण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रारही केली होती. महाविकास आघाडीचे जे मतदार आहेत त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता, तोच मुद्दा आता दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

मतदारांची नावे यादीतून काढली

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना भाजपच्या निवडणूक घोटाळ्यावर हल्ला चढवला. भाजप इमानदारीने निवडणुका जिंकत नाही, तर कशाप्रकारे निवडणुका जिंकतो हे मी देशाला सांगणार आहे, असे केजरीवाल यांनी ठणकावले. फसवणूक करून, मोठय़ा प्रमाणात मतदार यादीतील नावे काढून टाकून भाजपने महाराष्ट्र आणि हरयाणात कशा निवडणुका जिंकल्या याचे पुरावे माझ्याकडे आहेत. दोन दिवसांत याची पोलखोल मी करणार आहे, असा इशाराच केजरीवाल यांनी दिला.