भाजप लाडकी बहीण योजना बंद करणार, आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर घणाघात

तिजोरीत पैसे नाहीत असे सांगून भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महानगरपालिका निवडणुकीनंतर न्यायालयाकडूनच लाडकी बहीण योजना बंद करेल, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभा निवडणुकीवेळी लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देण्याची घोषणा सरकारने केली. ते अद्याप सुरू झालेले नाहीत. आनंदाचा शिधा योजना बंद झाली आहे. आता हळूहळू लाडक्या बहिणींची संख्या कमी केली जात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रीच मान्य करताहेत… कुछ तो गडबड है

तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर अ‍ॅम्ब्युलन्सपासून अनेक घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांच्या कामांना आता स्थगिती मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी मी 6 हजार कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा बाहेर काढला होता. सर्व घोटाळे सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात, रस्ते, पाणी, पाइपलाइन, कचरा अशा सर्वातच घोटाळे आहेत. आता सर्व घोटाळ्यांना मुख्यमंत्री स्थगिती देत आहेत म्हणजे काही तरी गडबड आहे हे मुख्यमंत्रीच मान्यच करीत आहेत असे ते म्हणाले. सर्वच गुन्हेगार एका पक्षात (दल) असले तर ‘दलदल’ होईल असा टोला त्यांनी यावेळी मारला.

विरोधी पक्षनेता लवकरच

विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एखाद्या पदावरून किंवा बसण्याच्या जागेवरून आमच्यात वादविवाद नाहीत. पदे येतात जातात. उद्या आम्ही सत्तेत असू, पण आता आम्ही सरकारकडे विरोधी पक्ष म्हणूनच प्रश्न मांडत आहोत. विरोधी पक्षनेता ही जनताही असू शकेल, पण विरोधी पक्षनेत्याचे नाव लवकरच तुमच्या पुढे येईल. सुरेश धस, नमिता मुंदडा या दोन आमदारांनीच सभागृहात विषय मांडलेले आहेत. जर भाजपच्याच सरपंचाला न्याय मिळत नसेल तर कोण विरोधी पक्ष, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.

मेट्रोत रंगरंगोटीतून 74 कोटी लाटले

एमएमआरडीमधील घोटाळ्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गर्डर टाकले नसताना पिलरना रंगरंगोटी करून 74 कोटी रुपये लाटले गेले असा आरोप करतानाच यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत असे आदित्य ठाकरे म्हणाले. मेट्रोचे काम पूर्ण झाले नसताना खांबांच्या रंगरंगोटीचे काम कुणी दिले, असा सवाल त्यांनी केला.