बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, अमित शहा यांनी खेळली महाराष्ट्राची चाल

बिहारमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, अशी घोषणा करत पेंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी महाराष्ट्राची चाल खेळली. नितीश कुमार यांचे हात आणखी मजबूत करा असे आवाहनही त्यांनी केले. गोपाळगंज येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

एनडीएममध्ये पाच पक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो, एनडीएलाच विजयी करायचे आहे. पक्षात कितीही मतभेद असू द्या, ते विसरून एकत्र या आणि एनडीएला विजयी करा असे आवाहन शहा यांनी केले. दरम्यान, यावेळी त्यांनी आरजेडीचे प्रमुख लालु प्रसादव यादव आणि त्यांची पत्नी तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यावरही टीका केली. त्यांनी 15 वर्षे राज्य केले. परंतु, बिहारमध्ये जंगलराज होते, असा आरोप त्यांनी केला.

दोनवेळा चूक झाली– नितीश कुमार

दोनवेळा चूक झाली परंतू, आता इकडे तिकडे जाणार नाही असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. पूर्वी बिहारमध्ये गुंडाराज होते, परंतु, आता लोक रात्री उशिराही रस्त्यावर फिरू शकतात असा दावाही नितीश कुमार यांनी केला.