
स्वतःला हिंदुत्त्वादी पक्ष आणि पार्टी विथ डिफरन्स असे म्हणवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजपचे हिंदुत्त्व फसवे आणि फक्त निवडणुकांसाठी असल्याचे याआधीही दिसून आले आहे. आता स्वतःला हिंदुत्ववादी म्हणावणारा भाजप ईद निमित्त 32 लाख मुस्लिमांना भेटवस्तू म्हणजेच ईदी देणार आहे. याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
रमजान ईद हा मुस्लिमांचा मोठा सण आहे. यासणापूर्वी त्यांच्याकडून रोज पाळले जातात. त्यानंतर ईदला ते एकमेकांना भेटवस्तू म्हणजेच ईदी देतात. यंदा भाजपही मुस्लिमांना ईदी देणार आहे. त्यासाठी भाजप मोठी मोहीम राबवत आहे. भाजप ईदपूर्वी 32 लाख मुस्लिमांना ‘सौगत-ए-मोदी’ किट भेट देणार आहे. ईदच्या आधी भाजप गरीब मुस्लिमांना भेटवस्तू वाटप करण्याची मोहीम सुरू करत आहे. ‘सौगत-ए-मोदी’ अल्पसंख्याक अभियान राबवून भाजप 32 लाख गरीब मुस्लिमांना भेटवस्तू देणार आहे. मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथून ही मोहीम सुरू होईल. या मोहिमेचे निरीक्षण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा करतील. भाजपचे म्हणणे आहे की गरीब मुस्लिमांना एक किट भेट दिली जाईल जेणेकरून ते देखील सन्मानाने ईद साजरी करू शकतील.
हे काम 32 हजार भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. प्रत्येक भाजप कार्यकर्ता एका मशिदीची जबाबदारी घेईल. अशाप्रकारे, देशभरातील 32 हजार मशिदींचा समावेश केला जाईल. यानंतर, ईदपूर्वी गरीब मुस्लिमांना भेटवस्तू दिल्या जातील. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की, ईद, भारतीय नववर्ष, नौरोज, ईस्टर, गुड फ्रायडे या सणांना लक्षात घेऊन भाजप ही मोहीम राबवत आहे.
भाजपकडून जिल्हा पातळीवर ईद मिलन कार्यक्रमाचेही आयोजन केले जाईल. सौगत-ए-मोदी’ या मोहिमेद्वारे 32 लाख मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे भाजपची ध्येय आहे. सौगत-ए-मोदी किटमध्ये कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर असेल. याशिवाय, महिलांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये सूट मटेरियल असेल आणि पुरुषांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये कुर्ता पायजमा मटेरियल असेल. एका किटची किंमत 500 ते 600 रुपये असेल, अशी माहिती मिळाली आहे.