…तेव्हा सरकार विरोधात आंदोलन करणारी भाजप आता गप्प का? भाजपच्या जुन्या पोस्ट व्हायरल

राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुद्दा गाजत आहे. बीडमध्ये शनिवारी निघालेल्या सर्वपक्षीय मोर्च्यात आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणी एकमुखाने करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात एका बड्या नेत्याचा समावेश असून सीआयडी पथकाने दोन फोन जप्त केले आहेत. त्यात त्या नेत्याचा कॉलही आहे. त्या बड्या नेत्याचे नाव जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच याबाबत सोशल मिडीयावर काही जुन्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावेळी सरकार विरोधात आंदोलन करणारी भाजप आता गप्प का? असा सवालही अनेक नेटकऱ्यांनी केला आहे.

सोशल मिडीयावर काही जुन्या पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात 15 जानेवारी 2021 ची भाजप महिला मोर्चाचे एक प्रसिद्धीपत्रक आहे. त्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तसेच चंद्रकांत पाटील यांचं 2021चं ट्वीटही व्हायरल होत आहे. त्यावेळी धनंजय मुंडे यांचे एका महिलेशी संबंध असल्याचे उघड झाले होते. तसेच धनंजय मुंडे यांनीही ते मान्य केले होते. यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तसेच राज्यभरात आंदोलनही केले होते.

आता मस्साजोगची निर्घृण हत्येची घटना आणि वाल्मिक कराड यांच्याशी धनंजय मुंडे यांचे असलेले संबंध या गंभीर घटना आहेत. या घटनेविरोधात राज्यातले वातावरण तापले आहे. सर्वपक्षीय मोर्चातही ही मागणी करण्यात आली. तरीही याबाबत भाजप गप्प का, त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या भाजपकडून आता या प्रकरणावर मौन का बाळगण्यात येत आहे, असा सवाल नेटकरी करत आहेत. 2021 च्या ट्विट आणि पोस्टमुळे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवणारी भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे.