भाजपला आंबेडकरांचं योगदान पुसायचं आहे, शहांनी राजीनामा द्यावा – राहुल गांधी

भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान पुसायचं आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर केली आहे. संसदेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर धक्काबुक्की झाल्याची घटना आज घडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ”अमेरिकेतील अदानींचे प्रकरण संसदेत आले, आम्हाला त्यावर चर्चा करायची होती. पण भाजपने ती चर्चा होऊ दिली नाही. अमित शहांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि आरएसएसची संविधानविरोधी, आंबेडकरविरोधी विचारसरणी असल्याचे आम्ही आधीच सांगत आहोत. त्यांना संविधान नष्ट करायचे आहे. त्यांनी आपली मानसिकता सर्वांसमोर दाखवली. त्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे आम्ही सांगितले, पण त्यांनी तसे केले नाही.”

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संसदेच्या दिशेने जात होतो. त्यावेळी तिथे भाजपचे खासदार आले, जे लाठ्या घेऊन थांबत होते. गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी आमची इच्छा आहे. अदानीवरील चर्चा टाळण्यासाठी भाजप मुख्य मुद्द्यावरून लक्ष हटवत असल्याचे ते म्हणाले.