यूपी BJP मधील कलह चव्हाट्यावर! योगी आदित्यनाथ आणि मौर्य यांच्यात उभी फूट?; अखिलेश यादव यांची ‘मान्सून ऑफर’

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपचा सपाटून पराभव झाला. अयोध्येतील प्रतिष्ठेच्या जागेवरही भाजपचा दारुण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत यूपीत भाजपची दाणादाण उडाल्यानंतर आता पक्षातील कलह चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केल्याने यूपी भाजपमधील राडा उघड झाला आहे. सोशल मीडियातून ही मागणी केल्याने हा कलह चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने यूपी भाजपमध्ये मोठे घमासान सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर यूपी भाजपमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. भाजप आणि मित्रपक्षातील नेते सवाल उपस्थित करत आहेत. लखनऊपासून ते दिल्लीपर्यंत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांचा सिलसिला सुरू आहे. अशातच यूपी भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवावर पक्ष नेतृत्वाला 15 पानांचा रिपोर्ट दिला आहे. यावरून आता यूपीतील माजी मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पंडित सुनील भराला यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची बाजू घेत भूपेंद्र चौधरी यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे. भूपेंद्र चौधरी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी सोशल मीडियातील एका पोस्टमधून केली आहे.

अखिलेश यादव यांची ‘मान्सून ऑफर’

यूपी भाजपमधील हा वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यात उभू फूट पडल्याचे चित्र आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर यूपीतील समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठे विधान केले आहे.

अखिलेश यादव यांनी यापूर्वीही केशव प्रसाद मौर्य यांना ऑफर दिली होती. ‘केशव प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले आहे. आजही त्यांनी 100 आमदार आणण्याची हिंमत दाखवावी. आपल्या बाजूने 100 आमदार आहेत, असे मौर्य सांगत होते. आजही केशव प्रसाद मौर्य ते 100 आमदार घेवून आले तर समाजवादी पार्टी पाठिंबा देईल’, असे अखिलेश यादव म्हणाले होते. आता अखिलेश यादव यांनी ट्विट करून पुन्हा केशव प्रसाद मौर्य यांना मान्सून ऑफर दिली आहे. ‘100 आणा, सरकार बनवा’, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.