नितेश तांबोळे, चिखली: संपूर्ण जगात खोटारडेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील ‘गोलमाल’ आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे. सावरगाव डुकरे येथे भाजपने लाभार्थी योजनेसाठी म्हणून गोळा केलेले गावकर्यांचे फोटो चक्क उपोषणाच्या बॅनरवर लावले. मात्र भाजपच्या या उपोषणाशी आमचा काडीचाही संबंध नाही, असे स्पष्ट करीत गावकर्यांनी त्या पोस्टरवरील स्वत:चे फोटो कापून टाकले.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम झाला. यावेळी शेतकर्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्यात आली. यात शेतकर्यांनी रक्ताने लिहिलेल्या निवेदनाची विटंबना झाली. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी कालपासून उपोषण सुरू केले आहे. बोंद्रे यांच्या उपोषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजयुमोचे संतोष काळे यांनीही अन्नत्याग केला.
भोळ्याभाबड्या गावकर्यांना फसवले
भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू केली. त्यासाठी वेगवेगळ्या लाभार्थी योजनांचे आमिष दाखवून गावकर्यांकडून त्यांचे फोटो घेण्यात आले. हे फोटो भाजपच्या बॅनरवर वापरण्यात आले. दुसर्या दिवशी आपले फोटो पाहून गावकर्यांना धक्काच बसला. काही गावकर्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना जाबही विचारला, पण भाजप कार्यकर्त्यांनी अरेरावी करून गावकर्यांनाच गप्प राहण्याचे फर्मान सोडले. मात्र फसवणूक झालेल्या गावकर्यांनी बॅनरवरील आपापले फोटो कापून टाकले आणि भाजपच्या अन्नत्यागाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले. यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली.
लाभार्थी योजनेचे नाव सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावकर्यांचे फोटो गोळा केले आणि ते पोस्टरवर लावले. आमचा आंदोलनाशी काहीही संबंध नाही.- अमोल बबनराव व्यवहारे, ग्रामस्थ