भाजपकडून हिंदुंचा वापर फक्त निवडणुकांसाठी, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

रेल्वे मंत्रालयाने दादरमधल्या 80 वर्ष जुन्या मंदिराला नोटीस बजावली आहे, ही नोटीस भाजप सरकार मागे घेणार का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच भाजपकडून हिंदुंचा वापर फक्त निवडणुकांसाठी केला जातो असा घणाघातही त्यांनी केला आहे.

सोशल मिडियावर एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, मणिपूर हिंसाचार आणि बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांवर पंतप्रधान गप्प आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे मुद्दे उपस्थित केले. मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे आणि तथे होणाऱ्या हिसांचारावर पंतप्रधान मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे, तसेच त्यांनी बांगलादेशाच्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवरही दुर्लक्ष केले आहे.

तसेच दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत आहेत. (त्यातले काही खरे आहे काही नाहीत) आणि भाजज कार्यकर्ते बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मोर्चे आणि आंदोलन करत आहेत. बांगलादेशी हिंदूंवर केंद्र सरकार भुमिका का घेत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

भाजपचे कार्यकर्ते बांगलादेशात जाऊही शकत नाही मग या आंदोलनांना अर्थच का? जे भाजपचे सरकार दोन देशातलं युद्ध थांबवू शकतं ते बांगलादेशसोबत का बोलत नाहीत? या कार्यकर्त्यांचा वापर भाजपचे नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी होत आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष मदत करण्याची वेळ येते तेव्हा सरकार काहीच बोलत नाही. दुसरीकडे भाजपच्या रेल्वे मंत्र्यांनी मुंबईतल्या 80 वर्ष जुन्या मंदिराला नोटीस पाठवली आहे. भाजप हिंदूंना फक्त निवडणुकीसाठी वापरून घेतंय असं दिसतंय.

बांगलादेशात ना हिंदू सुरक्षित आहेत ना महाराष्ट्रात मंदिरं. कारण भाजप सरकार हे मंदिर तोडण्यासाठी नोटीस पाठवत आहेत. भाजप कार्यकर्ते आणि भक्तांची होणारी आगपाखड मी समजू शकतो. त्यामुळे जे प्रश्न ते विचारू शकत नाहीत ते मी विचारतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशी हिंदूंना वाचवण्यासाठी काही पाऊल उचलतील का?की बांगलादेशच्या हिंदुंचा मुद्दा फक्त राजकीय पक्षांना मोर्चे आणि आंदोलन करण्यापुरता आणि भाजपला सामान्य नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी सिमीत आहे? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

तसेच भाजपच्या रेल्वे मंत्र्यांनी मुंबईतल्या 80 वर्षे जुन्या मंदिराला दिलेली नोटीस मागे घेणार का? की भाजप हिंदुंना फक्त निवडणुकीसाठी वापरून घेतात हे सिद्ध करणार असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.