
मिंधे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर, महेंद्र थोरवे, भाजपचे महेश बालदी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकल्याचा दावा करीत मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळय़ा निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत आमदारांना समन्स बजावल्याने या तीन आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश बालदी यांनीदेखील भ्रष्ट मार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा करत त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांनी याचिका दाखल केली आहे तर मिंधे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या उमेदवार प्रविणा मोरजकर यांनी याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर आज न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेची दखल घेत आमदार मंगेश कुडाळकर यांना समन्स बजावले व सुनावणी 17 मार्चपर्यंत तहकूब केली, तर आमदार महेश बालदी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली.
पुन्हा समन्स पाठवा
कर्जत येथील मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात हायकोर्टात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी याचिका दाखल केली आहे. खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार आणि डमी उमेदवार उभे करून थोरवे यांनी निवडणूक जिंकली असा दावा घारे यांनी याचिकेत केला असून या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने आमदार थोरवे यांना पुन्हा समन्स पाठवा असे आदेश देत सुनावणी 25 मार्चपर्यंत तहकूब केली.