Maharashtra Politics: ब्रिजभूषण पाझारे उमेदवारीवर ठाम, फोन नॉट रिचेबल; भाजपचे टेन्शन वाढले

Devendra Fadnavis And Brijbhushan pazare
Devendra Fadnavis And Brijbhushan pazare

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यातच चंद्रपूर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं आहे. याच कारण म्हणजे भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नसून पक्षाकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असतानाच ते आता नॉट रिचेबल झाले आहेत.

पाझारे नॉट रिचेबल…

चंद्रपुर मतदारसंघातील तिकीट पक्षाने नाकारल्याने भाजपचे ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांनी आपले नामांकन परत घेऊन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांना सहकार्य करावे, यासाठी पक्षश्रेष्ठी प्रयत्नशील आहेत. नामांकन परत घेण्यास पाझारे यांनी नकार घंटा दाखविली. त्यांच्यावर पक्षाचा दबाव वाढला होता. म्हणूनच कदाचित ते मागील चोवीस तासापासून नॉट रिचेबल होते, असं बोललं जात आहे. त्यांनी नामांकन अर्ज परत घेतलेला नाही. त्यामुळे चंद्रपूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पाझारे पूर्ण ताकतीने उतरणार, असे चित्र आता निर्माण झाले आहे. पाझारे यांचा भूमिकेमुळे आमदार किशोर जोरगेवार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आता वर्तवली जात आहे.

पाझारे यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने सुधीर मुनगंटीवार यांची सत्वपरीक्षा आता होणार आहे. अगदी सुरुवातीपासूनच पाझारे यांना तिकीट मिळावी यासाठी मुनगंटीवार प्रयत्नशील होते. वरिष्ठांच्या दबावामुळे पाझारे यांना तिकीट मिळाली नाही. त्यांची मनधरनी करण्यात मुनगंटीवार यांना अपयश आले. आता अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पाझारे यांच्यासोबतीला मुनगंटीवार उभे राहणार की, नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या जोरगेवार यांना साथ देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कुणी घेतला अर्ज मागे

राजुरा मतदारसंघातून माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बल्हारपूर मतदार संघातून ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे, कांग्रेस चे डॉ. संजय घाटे यांनी अर्ज मागे घेतला आहे. तर चिमूर मधून कांग्रेसचे धनराज मुंगले, वरोरामधून रमेश राजूरकर (भाजप), नरेंद्र जीवतोडे (भाजप) यांनी अर्ज मागे घेतला आहे.

दरम्यान, एकीकडे पाझारे भाजपसाठी डोकेदुखी ठरत असताना, दुसरीकडे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुकेश जिवतोडे यांनीही वरोरा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला आव्हान निर्माण झालं आहे.