भाजप माझ्या नावाने खोटं पसरवत आहे, राहुल गांधी यांचा आरोप

राहुल गांधी यांनी अमेरिकेत शीख समुदायाबद्दल विधान केले होते. हे विधान वादग्रस्त असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यामुळे भाजप नेत्यांनी अनेक राज्यात राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत. यावर आता राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या त्या विधानाचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. तसेच या विधानाचे स्पष्टीकरणही दिले आहे.

एक्सच्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मी अमेरिकेत केलेल्या विधानाबाबत भाजप खोटं पसरवत आहेत. हिंदुस्थान आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक शीख बंधु भगिनींना विचारतो की मी जे काही बोललो त्यात काय चुकीचं होतं? आपल्याला असा हिंदुस्थान नकोय का जिथे प्रत्येक शीख व्यक्ती कुणालाही न घाबरता आपल्या धर्माचे पालन करता येईल?

तसेच राहुल गांधी म्हणाले की भाजप नेहमी प्रमाणे खोटं बोलत आहेत. मला गप्प करण्यासाठी भाजप अधीर आहे, त्यांना खरं बोललेलं चालत नाही. पण ज्या मुल्यांमुळे हिंदुस्थानाची परिभाषा ठरते त्या मुल्यांसाठी मी लढणार, विविधेत एकता आहे, समानता आणि प्रेम आहे असेही राहुल गांधी म्हणाले.