विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होताच महाविकास आघाडीत जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीमधील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत. विशेषकरून ‘मातोश्री’ची कृपा लाभावी असा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे. आजही भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्नील चंद्रकांत येरुणकर आणि अॅड. राणी स्वप्नील येरुणकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करतानाच सर्वांना मार्गदर्शनही केले.
पूर्वी शिवसेनेत होतात, आता परत आपल्या घरी आला आहात. शिवसेनेचा भगवा आणि मशाल आता सोडू नका आणि महाराष्ट्रद्रोह्यांना हद्दपार केल्याशिवाय राहू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कुर्ला विधानसभा संघटक मनीष मोरजकर, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर आदी उपस्थित होते.
विदाऊट तिकीट आलात, स्वागत आहे
एक उमदा तरुण, सुशिक्षित व मनापासून काम करणारा माणूस आपल्यासोबत येत असल्याचा मला आनंद आहे. अनेकजण शिवसेनेत येऊ इच्छितात, पण तिकीट पाहिजे म्हणतात, यशवंतराव विदाऊट तिकीट आले आहेत, अशी मिश्कील करत उद्धव ठाकरे यांनी अजित आहात, यशवंत व्हा, अशा शुभेच्छा यशवंतराव यांना दिल्या. तसेच तुमच्या भविष्याची जबाबदारी शिवसेनेची आहे, असाही विश्वास त्यांनी दिला. याप्रसंगी शिवसेना उपनेते, आमदार राजन साळवी हेसुद्धा उपस्थित होते.
अजित पवार गटाचे सरचिटणीस यशवंतरावही शिवसेनेत
रत्नागिरी जिह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनीही ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेची मशाल हाती घेतली. शिवसेनेची मशाल घरोघरी पोहचली असून मनामनात पेटलेली आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कुर्ल्यातील गद्दाराला पूर्ण गाडायचेय
शिवसेना पक्ष ज्यांनी चोरला त्यांना सोडून शिवसेनेत आल्याबद्दल स्वप्नील येरुणकर यांना उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले. यावेळी कुर्ल्याचा विजय ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शिवसेनेचा गद्दार तिकडे उभा आहे. त्याला पूर्ण गाडायचे आहे. त्याचा एवढा दारुण पराभव केला पाहिजे की शिवसेनेच्या आणि छत्रपती शिवरायांच्या भगव्याशी गद्दारी करण्याचा विचार कुणी स्वप्नातही आणला नाही पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही सर्व मशालीसारखे धगधगत्या मनाचे आहात, त्यात चोरांची टोळी तुम्ही राजकारणातून जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.