भारतीय जनता पक्षानेच जाहिर केले आहे की, येणारा मुंबईचा महापौर हा परप्रांतीय असेल. भाजप पुरस्कृत काही जणांची मस्ती वाढली आहे. मराठी माणसाविरोधात प्रवृत्ती वाढत आहे. त्यांना धडा शिकवल्या शिवाय मुंबईकर रहाणार नाही, असा इशारा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. राऊत हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, आताच्या निवडणूका मेरीटवर होतात का? हा प्रश्न आहे. ईव्हीएम बाबत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्याची निवडणूक प्रक्रिया ही भ्रष्ट झाली आहे. चांगल्या वातावरणात निवडणूका घ्यायच्या असतील आणि मतदारांचा कौल लक्षात घ्यायचा असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूका घेतल्या पाहिजेत, ही आमची आग्रही मागणी रहाणार आहे. बॅलेट पेपरवर ज्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका झाल्या त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विजयी झाला. ईव्हिएमबाबत निर्माण झालेली साशंकता हे भाजपच्या विजयाचे गमक आहे, अशी टिका राऊत यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे उपस्थित होते