भाजप-मिंधेंमध्ये जनता दरबारवरून शह-काटशह; गणेश नाईक शुक्रवारी नागरिकांची गाऱ्हाणी ऐकणार

भाजप आणि मिंध्यांमध्ये जनता दरबार घेण्यावरून शह-काटशहचे राजकारण सुरूच आहे. राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात जनता दरबार घेतला होता. आता दुसऱ्यांदा 11 एप्रिल रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार आयोजित करण्यात आला असून त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मिंधे गटाचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात हा जनता दरबार होत आहे. मिंध्यांना डिवचण्यासाठी तेथे भाजपने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुरू केली आहे. दरम्यान जनता दरबारवरून मिंधे व भाजपमध्ये जुंपली असतानाच प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार काय, असा एकच सवाल ठाणेकरांनी केला आहे.

शुक्रवारी ज्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार होणार आहे तो परिसर मिंध्यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात आहे. या जनता दरबारसाठी भाजपच्या कार्यकर्त्यानी बॅनरबाजी करून जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान यापूर्वी 24 फेब्रुवारीला गणेश नाईक यांचा पहिला जनता दरबार ठाण्यात पार पडला होता. या दरबारात ठाणेकरांनी आपली गाऱ्हाणी निवेदन स्वरूपात मांडली होती. एकूण 641 निवेदने प्राप्त झाली होती. नाईकांच्या जनता दरबाराला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मिंधे गटात अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर मिंर्धेच्या बगलबच्चांनी जनसंवाद उपक्रम सुरू केला.

आव्हान देण्याची एकही संधी भाजप सोडत नाही
भाजपबरोबर सत्तेत असलेल्या मिंधे गटाकडून जनता दरबारावर अप्रत्यक्ष टीकाही झाली होती. परंतु गेल्या 3 वर्षांत ठाणेकरांचे प्रश्न सोडवता आले नसल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येत्या 11 एप्रिलला सकाळी 10 वाजता नाईक पुन्हा जनता दरबार घेणार आहेत. सुरुवातीला जनता दरबारावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार घमासान झाले. त्यांनतर नवी मुंबईत 14 गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यावरून नाईकांनी मिंध्यांना थेट अंगावर घेतले. काही दिवसांपापूर्वी मिंधेंच्या साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्टचे काम बंद केले. दरम्यान मिंधे गटाला आव्हान देण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याने भविष्यात मिंधे आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.