400 पार म्हणत पळाले, पण  शेवटी किती झाले? कल्याण बॅनर्जी यांनी उडवली मोदींच्या घोषणेची खिल्ली

तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अब की बार, 400 पार या घोषणेची खिल्ली उडवली. लहान मुलं खेळत असलेल्या चु कित कित म्हणजेच महाराष्ट्रातील ठिकऱ्यांच्या खेळाचे उदाहरण देत त्यांनी एनडीएला सणसणीत टोला लगावला. आधी 400 पार म्हणत पळाले. पण कित कित कित कित करत शेवटी किती झाले? 240 झाले. त्या खेळातही हरले, असे कल्याण बॅनर्जी यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. अनेक संसद सदस्य खळखळून हसले.

बिर्ला यांना म्हणाले,मी तुमच्याकडे बघतोय

सत्ताधारी बाकांवरील खासदारांकडे बघून बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बॅनर्जी यांना प्रथेप्रमाणे त्यांच्याकडे बघून बोलायला सांगितले. यावर कल्याण बॅनर्जी यांनी, मी तर तुम्हालाच बघतोय.  तुमच्यापेक्षा स्मार्ट इथे कुणीच नाही. त्यामुळे आम्ही तुम्हालाच बघणार. इथे चांगल्या अभिनेत्रीही आल्या आहेत; पण आम्ही त्यांना सोडून तुम्हाला बघतो. फक्त तुम्हालाच बघतो. तुम्हीच, तुम्ही इथे व्यापून उरलात, अशी मिश्कील टिपण्णी बॅनर्जी यांनी करताच त्यांना विरोधकांनी मनापासून दाद दिली. 

कुठेही गेलात तरी कुबडय़ा लागणारच

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना, तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने देशात बदल घडवून आणला आहे. आता देशात अस्थिर सरकार आणि मजबूत विरोधक आहेत. सरकार चालवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल-युनायटेड या दोन कुबडय़ांचा पंतप्रधानांना वापर करावा लागत आहे. भाजप नेते हिंदुत्वावर विश्वास ठेवत नाहीत. ते केवळ मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर करतात, अशी टीका काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनीही केली.

मोदी, तुम्ही रात्री झोपू तरी कसे शकता…

बॅनर्जी मोदींच्या द्वेषबुद्धीवरही तुटून पडले. गेल्या 10 वर्षांत त्यांनी विरोधी पक्ष किंवा बिगर-भाजप राज्यांतील मुख्यमंत्र्यांसाठी पंतप्रधानांकडून कोणतेही सौम्य वा गोड शब्द किंवा प्रशंसा मी ऐकलेली नाही. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, सोरेन, केजरीवाल यांच्याबद्दल तुम्हाला इतका द्वेष का? तुम्ही विरोधी पक्षांबद्दल इतकी द्वेषभावना घेऊन रात्री झोपू तरी कसे शकता, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.