तुमच्या 55 जागा येणार आहेत, तर आमच्या उमेदवारांना फोन का करता? अरविंद केजरीवाल यांचा भाजपला सवाल

दिल्ली विधानसभेचे निकाल शनिवारी जाहीर होणार आहेत. आता भाजपचा दारुण पराभव होत असल्याने त्यांनी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. तसेच आपच्या काही आमदारांना भाजपकडून 15 कोटींची ऑफर देण्यात येत आहे, असा आरोप आपकडून करण्यात आला होता. आता आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. तुमच्या 55 जागा येणार आहेत, असा दावा तुम्ही करता, तर मग आमच्या उमेदवारांना फोन करून ऑफर का देत आहात? असा सवाल केजरीवाल यांनी भाजपला केला आहे.

दिल्लीत आप आणि भाजप सत्ता येण्याचा दावा करत आहेत. आमच्या 55 जागा निवडून येतील, असा दावा भाजपने केला आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी सावाल करत भाजपला टोला लगावला आहे. भाजप 55 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा करत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसात आमच्या 16 उमेदवारांना असे फोन आले आहेत की जर त्यांनी ‘आप’ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर ते त्यांना मंत्री बनवतील आणि प्रत्येकी 15 कोटी रुपये देतील. मात्र, आमचा एकही उमेदवार फुटणार नाही, असा दावाही केजरीवाल यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जर भाजपला 55 पेक्षा जास्त जागा मिळत असतील, तर त्यांनी आमच्या उमेदवारांना बोलावण्याची काय गरज आहे?’ काही बनावट सर्वेक्षण काही उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी हे वातावरण निर्मितीसाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.