दिल्लीतल्या वीज कंपन्या अदानींच्या घशात घालण्यासाठी भाजपने माझ्यावर दबाव आणला असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपने इमानदारीने निवडणुका लढवल्या नाहीत असेही केजरीवाल म्हणाले.
दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी जेव्हा दिल्लीचा मुख्यमंत्री होतो तेव्हा दिल्लीच्या सर्व वीज कंपन्या गौतम अदानींच्या घशाल घालण्यासाठी माझ्यावर दबाव होता. मी त्याला नकार दिला. कदाचित त्यामुळेच मला तुरुंगात टाकलं असावं. माझे भाजपला आव्हान आहे, उद्या जर भाजपचे दिल्लीत राज्य आले तर ते अदानीला दिल्लीच्या वीज कंपन्या देणार नाहीत हे जाहीर करावे.
तसेच दिल्लीत मतं कापण्यासाठी भाजपने षडयंत्र रचले आहे. फक्त दोन दिवस थांबा, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, लवकरच मी भाजपचे हे षडयंत्र बाहेर आणणार आहे. यांनी महाराष्ट्रात आणि हरयाणात कशा निवडणुका जिंकल्या हे मी सांगणार आहे. महाराष्ट्रात आणि हरयाणात हे इमानदारीने निवडणूक जिंकले नाहीत असेही केजरीवाल म्हणाले.