केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा भाजपचा कट; संजय सिंह यांचा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात ठार मारण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप) रविवारी केला. 3 जून ते 7 जुलै दरम्यान त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 26 वेळा घटल्याचा दावाही आपने वैद्यकीय अहवाल दाखवत केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी केजरीवाल यांच्या जिवाशी खेळ चालवला असल्याचा आरोप आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी केला. तिहार तुरुंगात केजरीवाल यांची तब्येत खालावण्यासाठी भाजपच जबाबदार आहे असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजपने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नायब राज्यपाल आणि संपूर्ण भाजप ज्या प्रकारे खोटे अहवाल जारी करून केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत असत्य विधाने करत आहेत, ते पाहता राज्यपाल आणि भाजप केंद्र सरकारच्या संगनमताने केजरीवाल यांच्या जिवाशी खेळत असल्याचा संशय अधिक दृढ होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

अहवालांचा दिला दाखला

 केजरीवाल यांना मधुमेह, वजन कमी होणे, अशक्तपणा, हायपोग्लायसेमियाचा त्रास होत असल्याचे म्हटले होते. हा पहिला अहवाल आहे. दुसरा अहवाल केजरीवाल ठीक असल्याचे सांगतो आणि हा अहवाल जाणूनबुजून राज्यपाल कार्यालयाकडून मीडियाला शेअर केला जातो; परंतु या अहवालात असेदेखील लिहिले आहे की, त्यांचे वजन सतत कमी होत आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने त्यांची तपासणी केली आहे आणि त्यांना हायपोग्लासेमियाचा त्रास आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.