गोदाममाफियांच्या घशात जागा घालण्यासाठी गरीबाला बेघर केले, मोदी आवास योजनेतील घरांवर भाजपच्याच टग्यांनी बुलडोझर फिरवला

गोदाममाफियांच्या घशात जागा घालण्यासाठी मोदी आवास योजनेतून मिळालेल्या घरावर आठ दिवसांतच भाजपच्या टग्यांनी खुलेआम बुलडोझर चालवला आहे. हा संतापजनक प्रकार भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे. हक्काचे छप्पर मिळाल्याने आनंदात असलेल्या कुटुंबाला दंडेली करत घराबाहेर काढले आणि स्वप्नातील या घरावर डोळ्यांदेखत जेसीबी फिरवला. या घटनेला दोन दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही.

देशातील एकही गरीब बेघर राहू नये यासाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून आम्ही अमुक घरे दिली याच्या लाखो रुपयांच्या जाहिरातीदेखील आतापर्यंत करून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. याच योजनेतून पडघाजवळील कुरुंद ग्रामपंचायत क्षेत्रातील दळेपाडा येथील सुदाम भोईर यांना घरकुल मिळाले होते. 27 मार्च 2025 रोजी पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून सुदाम भोईर यांचा गृहप्रवेश केला गेला. हक्काचे घर मिळाले म्हणून भोईर कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, परंतु त्यांचा हा आनंद भाजपच्या मस्तवाल पदाधिकाऱ्यांनी हिरावला आहे.

ए चल बाहेर हो..

3 एप्रिल रोजी याच गावातील भाजपचे पदाधिकारी असलेले कंठ विशे व जितेंद्र बिरो जेसीबी घेऊन येथे धडकले. या टग्यांनी भोईर यांना आवाज देत ‘ए चल बाहेर हो.. तुला दाखवतोच’ अशी अरेरावी केली. घाबरलेले भोईर कुटुंब बाहेर येताच नीळकंठ व जितेंद्रने या घरावर निर्दयीपणे बुलडोझर फिरवला. सुदाम भोईर यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

मला न्याय द्या..

घर पाडल्यानंतर सुदाम भोईर यांनी पडघा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र दोन दिवस उलटले तरी पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यानंतर भोईर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देत ‘मला न्याय द्या, आरोपींवर कारवाई करा’ अशी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत पोलीस योग्य ती कारवाई करतील असे उत्तर ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी दिले आहे.