राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदद्ल भारतीय जनता पक्षाच्या मनात काय भावना आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यातून दिसून आलेच आहे. बाबासाहेबांबद्दलचा आकस, चिड व संताप या विधानातून व्यक्त झाला आहे. भाजपा व अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल माफी तर मागितली नाहीच उलट भाजपाच्या गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचे पाप भाजपाला झाकता येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या अशा भ्याड हल्ल्यांना काँग्रेस भिक घालणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाच्या गुंडशाही विरोधात काँग्रेस लढत राहणार. काँग्रसने जुलमी, अत्याचारी इंग्रजांशी लढून 150 वर्षांच्या ब्रिटीश सत्तेला देशातून हाकलून लावले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला न मानणाऱ्या भाजपाच्या गुंडांविरोधात काँग्रेस लढेल आणि संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजेल, असेही नाना पटोले म्हणाले.