भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिवसेनेच्या रणरागिणींची पेण पोलीस ठाण्यावर धडक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या रणरागिणींनी पेण पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपी हा भाजपच्या जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीसांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला दयामाया दाखवण्यात येऊ नये. जर त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिसांना दिला.

भाजपच्या रायगड जिल्हा महिला आघाडी सरचिटणीसचा मुलगा मनीष म्हात्रे याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपीने या मुलीबरोबर प्रेमाचे खोटे नाटक केले. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पेण पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून मनीष याला अटक केली आहे. आरोपी हा भाजप पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी आज पेण पोलीस ठाण्यावर धडक देऊन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन दिले. याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, शहरप्रमुख सुहास पाटील, दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, स्मृती म्हात्रे, छाया बामणे, मोहिनी गोरे, सुधाकर म्हात्रे, समीर म्हात्रे, नंदू मोकल, गजानन मोकल, विजय पाटील, योगेश पाटील, विनोद म्हात्रे, समीर साटी, नामदेव पिंगळस्कर, राकेश पाटील, तुकाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह

राज्यात वारंवार महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उरण, बदलापूर, पुणे, पेण अशी अनेक प्रकरणे दररोज घडत आहेत. शासनाने महिला सुरक्षेविषयी अधिक सतर्क होऊन कठोर कायदे करून पोलिसांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. गुन्हा करणाऱ्या नराधमांवर वचक बसेल असे कारवाईचे स्वरूप असावे, अशी प्रतिक्रिया महिला आघाडीच्या जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.