
मीरा-भाईंदरमधील भाजप कार्यालयात भाजपच्याच महिला कार्यकर्तीने तुफान राडा करत ऑफिसची तोडफोड केली. भाजपचे शहर जिल्हा माजी सृष्टी मंडळाचे अध्यक्ष व बूथ संयोजक पदाधिकारी नवीन सिंह यांच्या कार्यालयात घुसून सोनल सावंत उर्फ पटेल यांनी अंतर्गत गटबाजीतून ही तोडफोड केली. महिलांचा सन्मान केला नाही तर सगळ्यांना जाळून खाक करेन असा सज्जड दमच नवीन सिंह यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनल सावंत यांनी दिला आहे.
भाजपमधील गटबाजीमुळे संतापलेल्या भाजपच्या माजी महिला पदाधिकारी सोनल सावंत उर्फ पटेल आज नवीन सिंह यांच्या मीरा रोडमधील कार्यालयात घुसल्या. दरम्यान नवीन सिंह हे ऑफिसमध्ये नसल्याने सोनल सावंत उर्फ पटेल यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दरडवण्यास सुरुवात केली. काही कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचादेखील प्रयत्न केला. इतकेच नाही तर कार्यालयातील लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि प्रिंटर फोडले, टेबलवर ठेवलेली कागदपत्रे फाडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरून दिली धमकी
संतापलेल्या सोनल सावंत उर्फ पटेल या महिला कार्यकर्तीने सोशल मीडियावर आगपाखड करत नवीन सिंह याला दमच दिला आहे. नवीन सिंह स्वतःला शेर समजतो, त्याला हेच समजावण्यासाठी आली आहे की हिंदू शेरनिया अजूनही जिवंत आहेत. महिलांचा सन्मान केला नाही तर सगळ्यांना जाळून राख करून टाकेन, जय मातादी असा मेसेज तिने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.