भाजप खासदाराच्या सुनेची ‘रॅश ड्रायव्हिंग’, कारची धडक बसून तरुण ठार, नातेवाईकांनी मृतदेह घरासमोर ठेऊन केलं चक्का जाम आंदोलन

भाजप खासदाराच्या सुनेच्या भरधाव कारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याचा मृतदेह खासदाराच्या घराबाहेर ठेवला आणि चक्काजाम आंदोलन केले.

मध्य प्रदेशमधील सीधी लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. राजेश मिश्रा यांची सून डॉ. बीना मिश्रा यांच्या कारने 2 एप्रिल रोजी एका स्कूटीला धडक दिली होती. या अपघातात स्कूटीचालक अनिल द्विवेदी हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गोंधळ घातला.

शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह खासदाराच्या घराबाहेर ठेवला आणि आंदोलन सुरू केले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत खासदाराच्या सूनेविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.

मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनुसार, अपघात झालेली कार (क्र. एमपी 17, जेई 5613) ही खासदार डॉ.. राजेश मिश्रा यांची सून डॉ. बीना मिश्रा चालवत होती. मात्र अपघातानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये ड्रायव्हरचे नाव टाकले आहे. अपघात झालेली कार खासदाराचा मुलगा डॉ. अनुप मिश्रा यांच्या नावावर असून जोपर्यंत खासदाराच्या सूनेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जागचे हलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.

दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 2 एप्रिल रोजी हा अपघात झाला होता आणि त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या अनिल द्विवेदी या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल झालेला असून मृताच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता जे आरोप करण्यात आले आहेत त्यांचा तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस उप अधीक्षक गायत्री तिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.