
सर्वोच्च न्यायालय आणि हिंदुस्थानचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अवमानप्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने महाधिवक्तांना पत्र लिहून केली आहे.
सर्वोच्च न्यायालय देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे. तसेच देशात सुरू असलेल्या गृहयुद्धाला सरन्यायाधीश जबाबदार आहेत, अशी बेजबाबदार वक्तव्ये दुबे यांनी केली होती. विधेयकांवर निर्णय घेण्यास राष्ट्रपती आणि राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या डेडलाइनच्या निर्णयावर व्यक्त होताना दुबे यांची जीभ घसरली होती.
वक्फ सुधारणा कायद्यासंबंधी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणात व्यक्त होतानाही त्यांनी धार्मिक तेढ पसरेल, अशी वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. आता त्यांनी थेट सरन्यायाधीशांना लक्ष्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठsवर चिखलफेक केली आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाचा अवमान कायद्याच्या कलम 15 (1) (ब) अंतर्गत कारवाईची मागणी महाधिवक्ता आर वेंकटरमणी यांच्यासमोर करण्यात आली आहे. हे पत्र लिहिणारे वकील अनस तनवीर वक्फ सुनावणीप्रकरणी याचिकाकर्त्यांची बाजू मांडत आहेत. ”