मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथील सभा मराठा आंदोलकांनी उधळून लावली. मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे अवघ्या काही वेळातच खासदार डॉ. महास्वामी यांनी सभास्थळाहून काढता पाय घेतला.
भाजप खासदार डॉ. महास्वामी यांची तरटगाव येथे आज दुपारी सभा होती. सध्या गावागावात राजकीय पुढाऱयांना मराठा कार्यकर्त्यांनी गावबंदी केली आहे. अशाही स्थितीत तरटगाव येथे खासदार महास्वामी यांची सभा सुरू असल्याची माहिती मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्ते सभास्थळी घोषणाबाजी करीत आले. तरीही खासदारांनी आपले भाषण रेटण्याचा प्रयत्न केला असता, कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरत त्यांचे भाषण बंद पाडले. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.