भाजप आमदाराला वकिलांनी बेदम मारलं, पोलिसांसमोर कानफटवलं; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश वर्मा यांना मारहाण झाली आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी पोलिसांसमोरच भाजप आमदाराच्या कानाखाली मारली. यानंतर त्यांचे समर्थक वकिलही आमदारावर तुटून पडले. वकिलांनी त्यांना पळूपळू मारले. धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोर त्यांना बेदम चोपण्यात आले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीवरून बार असोसिएनशनचे अध्यक्ष अवधेश सिंह आणि आमदार योगेश वर्मा यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या अवधेश सिंह यांनी पोलिसांसमोरच योगेश वर्मा यांच्यावर हात उगारला. इतर वकिलांनीही आमदाराला घेराव घालत मारहाण केली.

हा राडा झाल्यानंतर आमदाराच्या पाठीराख्यांनीही बार असोसिएशनच्या अध्यक्षाला मारण्यासाठी धाव घेतली. यामुळे दोन्ही बाजुकडील लोकं आमनेसामने आले. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना आवरले आणि महत्प्रयासाने दोन्हीकडच्या लोकांची समजूत काढली. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर हा गोंधळ झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान, या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना योगेश वर्मा म्हणाले की, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आले होते. त्यावेळी माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. आधी कामगार संघटनेचे नेते राजू अग्रवाल यांना मारहाण करून त्यांचा अर्ज फाडला. त्यांची भेट घेण्यासाठी गेल्यावर अवधेश सिंह यांनी माझ्यावरही हात उगारला. याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.