उत्तर प्रदेशातील बहराइच येथे देवी विसर्जनातील मिरवणुकीवरून झालेल्या हिंसाचाराप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश्वर सिंह यांनी भाजपच्या नगर अध्यक्षांसहीत सात जणांविरोधात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरेश्वर सिंह यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात दंगल भडकवणे, धारदार हत्यारांनी हल्ला करणे, हत्येचा प्रयत्न करणे, मारहाण करणे अशा तक्रारी या सर्वांविरोधात केल्या आहेत.
हरदी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या महराजगंज येथे दुर्गामातेच्या विसर्जनावेळी डीजेवर गाणी वाजवण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. याच वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
यादरम्यान 22 वर्षीय रामगोपाल मिश्रा याचा मृत्यू झाला. त्याच्यावर चाकूने वार केल्याचे उघड झाल्यानंतर सोमवारी पाच ते सहा हजार लोकांचा जमाव त्याच्या घरी जमला. त्यानंतर संतप्त लोकांनी 5 किलोमीटरचा मोर्चा आणि अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले, मात्र जमावाने मागे हटण्यास नकार दिला. त्यानंतर जमावाने अचानक उग्र रुप धारण केले आणि जाळपोळ सुरू केली.
जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलीसही मागे हटले. संतप्त जमावाने गाड्या, रुग्णालय, शोरुम, घर, दुकानांना आग लावली. यामुळे पोलिसांची अधिकची कूमक मागवण्यात आली. पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित केले आहे.