बीड प्रकरणी मी धनंजय मुंडे यांचा राजीनाम मागितला नाही असे स्पष्टीकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी दिले आहे. तसेच वाल्मीक कराडने जेव्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं तेव्हा जी गाडी कराडला सोडायला आली ती गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातली होती असा गौप्यस्फोटही धस यांनी केला.
आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धस म्हणाले की, बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. फडणवीस यांनी निकम यांच्याशी चर्चा केल्याचेही धस यांनी सांगितले आहे.
देशमुख हत्येप्रकरणी सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. पण त्यातील प्रमुख अधिकारी सोडले तर काही कर्मचाऱ्यांबद्दल आक्षेप आहे. ही बाब मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्या कर्मचाऱ्यांबद्दल आक्षेप आहे त्यांच्याबद्दल लेखी निवेदन द्या त्यांना हटवले जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी मागितला नाहिये असे धस म्हणाले.
तसेच आका मोठ्या आकांसोबत सगळीकडे होते. अजित पवारांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार. तीच गाडी पोलिसांना स्वाधीन करताना वापरली गेली. तीच गाडी केज पोलीस ठाण्यात भेटायला जाताना वापरली गेली. हा खटला बीडमध्ये चालवावा, पण बीडमधील पोलीस ठाण्यात या आरोपींना ठेवू नये. या आरोपींना संभाजीनगरच्या हरसूलला हलवावेत किंवा नाशिकच्या तुरुंगात हलवावेत. बीडमध्ये एकाच वर्गातले अधिकारी आलेले आहेत, त्यामुळे बीडमध्ये समस्या निर्माण होऊ शकतो. आता मी फक्त आरोपींना तिथून हलवण्याची मागणी करत आहे, भविष्यात ही केसही बीडमधून हलवण्याची वेळ येऊ शकते असेही धस म्हणाले.